अमृतकाळाचे आगमन : आगामी १००० वर्षांची पायाभरणी

आपला भारत देशाने सध्या त्याच्या अमृतकाळामध्ये प्रवेश केला आहे. अर्थात देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होऊन आपल्या शतकी वाटचालीकडे देश पुढे सरकू लागला आहे. येणारे २५ वर्ष हे आपल्यासाठी जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच महत्त्व हे गेल्या १० वर्षांचे देखील आहे. कारण पुढील २५ वर्षात आपल्याला कुठे जायचे आहे, याचा विचार करताना सध्या आपण कुठे आहोत, याचा देखील विचार करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा ‘देशाचे सुदैव’ हा एकच शब्द आपल्या सर्वांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. कारण गेल्या दहा वर्षांपासून या देशाची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ हातांमध्ये आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज प्रत्येक क्षेत्रात देशाने आपले नाव उंचावले आहे. सामाजिक उन्नतीबरोबरच सर्वच आघाडींवर देश वेगाने प्रगती करत आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सातव्यावरून पाचव्या आणि आता पाचव्यावरून तिसऱ्या स्थानावर जात आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला आहे, परराष्ट्र संबंधांमध्ये आमुलाग्र बदल घडून जागतिक राजकारणात देशाचे महत्त्व वाढले आहे. गेल्या १० वर्षात देशातील २३ कोटी जनता दारिद्य्ररेषेच्या वर आली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि अवकाश विज्ञानात देशाने भली मोठी झेप घेतली आहे. ३ कोटीहून अधिक नागरिकांना स्वतःची घरे, देशामध्ये १००% नागरिकांना वीजपुरवठा, कोट्यावधी स्वच्छतागृहांची निर्मिती, कोट्यावधी नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा, आयुष्यमान भारत योजनेतून ३ कोटी नागरिकांना मोफत पिका, ३८ कोटी शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ, ५८ कोटी नागरिकांचे बँक खाते आणि त्यातून सरकारी लाभ आणि तब्बल ८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य अशा अनेक गोष्टी आज देशात घडल्या आहेत.

सुशासन म्हणजे काय असते, सरकारची जनतेप्रति कर्तव्य काय असतात, या सगळ्या गोष्टी गेल्या दहा वर्षांमध्ये देश अनुभवत आहे. भेदभाव विरहीत विकास आज देशात होत आहे. देशातील घटकाला आज संधी मिळत आहे. देशाच्या राष्ट्रपती पदावर महिला नेतृत्व बसले आहे. देशाची अर्थव्यवस्था एक महिला संभाळत आहे. प्रत्येक क्षेत्रात देश आत्मनिर्भर बनत आहे. गेल्या १० वर्षातील या भरीव कामगिरीचा आढावा घेतल्यास आणि त्याचे सातत्य असे ठेवल्यास आगामी अमृतकाळ हा देशाला वैभवाच्या शिखरावर घेऊन जाणारा असेल, हे निश्चित आहे. त्यामुळे ‘विकसित भारत’ घडविण्याच्या या चळवळीत केंद्र सरकारच्या साथीला आपण सर्वांनी देखील उभे राहिले पाहिजे.