आधुनिक भारताची शान “अटल सेतू”

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई नगरीत नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभहस्ते अटल सेतूचे लोकार्पण पार पडले. अटल सेतूमुळे मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. आधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेला अटल सेतू म्हणजे वेगवान भारताचे प्रतिबिंब आहे. सागर, जमीन आणि दलदल अशा तीनही भागांचा वापर करून हा प्रकल्प उभारलेला आहे. हे प्रकल्परुपी दिव्य पूर्णत्वास नेण्यासाठी तब्बल १५०० हून अधिक निष्णात अभियंते आणि १६,५०० कुशल मजुरांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. सुमारे १.२ लाख टन स्टीलचा वापर करून हा सेतू उभा केला आहे. या प्रकल्पात वापरलेले स्टील जगप्रसिद्ध आयफेल टॅावरसाठी वापरलेल्या स्टीलच्या तब्बल १७ पट अधिक आहे.

मुंबईकरांसाठी वेगाची नवी भाषा अधोरेखित करणारा हा अटल सेतू तब्बल २२ किलोमीटर लांबीचा आहे. सुमारे १००० हजार खांबांवर उभ्या असलेल्या या मार्गावर १०० किमी प्रतितास वेगाने प्रवास करता येणार आहे. यामुळे मुंबई सागरी किनारा रस्त्याद्वारे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना अटल सेतुद्वारे विनाथांबा मुख्य भूमीकडे जाता येणार आहे. साहजिकच यामुळे नागरिकांचे प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. यातून नागरिकांची एक तासाहून अधिक वेळेची बचत होईल आणि त्यातून कार्बन वायू उत्सर्जन सुद्धा कमी होणार आहे. यातून प्रदूषणवाढीस काही प्रमाणात आळा बसेल. यातून आपल्या लक्षात येते, अटल सेतू बनवताना पर्यावरणाचा किती सखोलपणे विचार केला आहे. या परिसरात स्थलांतरित फ्लेमिंगोचा अधिवास असल्याने समुद्रातील भागात खारपुटी व दलदल इत्यादी पर्यावरणीय वैशिष्ट्यांना कमीत कमी नुकसान होईल याची पुरेपूर काळजी संबंधित यंत्रणेकडून घेतली गेली आहे. या सेतूची सुरक्षेची बाब लक्षात घेऊन बंद पडलेली वाहने नेण्यासाठी स्वतंत्र मार्गिका, आधुनिक ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम तर पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून साऊंड बॅरीअर्स लावण्यात आले आहेत.                

पंतप्रधान नरेंद्र मोदिजींच्या प्रभावी नेतृत्वाखाली संपूर्ण देशात विविध विकास कामांद्वारे एक नवे पर्व सुरु झाले आहे. देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांचे नाव या सेतूला देऊन, अटलजींच्या थोर कर्तृत्वाला याद्वारे एक अनोखी मानवंदना दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या “राष्ट्र प्रथम” या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले अटलजी म्हणजे येणाऱ्या पिढ्यांसाठी राष्ट्रप्रेमाचे विद्यापीठ! या सेतुद्वारे प्रत्येक नागरिकाला विकासाच्या गतिमान वाटांवरून धावताना राष्ट्रप्रेमाचीही प्रेरणा मिळत राहो. हीच मंगल कामना!