आमदार संभाजी पाटील निलंगेकर – अध्यात्माशी नाळ जोडलेला नेता  

माणूस तसा भौतिक सुखांचा भुकेला असतो. सुखासीन आयुष्याची एकदा सवय लागली की माणसं परमेश्वराला विसरतात. अर्थात याला काही सन्माननीय मंडळी अपवाद असतात. ज्यांना आपल्यातल्या आध्यात्मिक गुणधर्मांचा कधीच विसर पडलेला नसतो. किंबहुना आपल्या वर्तनातून इतरांसाठी सुद्धा सकारात्मक उर्जेचे स्रोत निर्माण करत असतात. अशा लोकांच्या नुसत्या स्पर्शाने एक उत्साह संचारतो. कुठून येत असेल हा अखंड उर्जेचा प्रवाह? कुठून येत असतील या दिव्य अनुभूती? नक्कीच यामागे काहीतरी आध्यात्मिक दृष्टीकोन असतील, काही साधना असतील. लातूर जिल्ह्यातील आमदार संभाजी पाटील निलंगेकर अशाच आध्यात्मिक विचारांचा वारसा जपणारे सात्विक व्यक्तिमत्व आहे.

जनसेवेचे बाळकडू त्यांना त्यांच्या आई-बाबांकडून मिळाले आहे. सर्वसामान्य जनतेची सुखदुःखे संवेदनशीलपणे समजून घेऊन त्यांना कायम मदत करण्याचे दातृत्व संभाजी भैय्या नेहमीच दाखवत असतात. त्यांच्या मातोश्री आदरणीय अक्कांचे समाजसेवा आणि राजकीय क्षेत्रातील योगदान तर सर्वश्रुत आहे. संभाजी भैय्यांना भक्तिमार्गाचे महत्व अगदी लहानपणापासून समजून सांगण्यात अक्कांचा खूप मोठा वाटा आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील कार्य करण्यात व्यग्र असणारे संभाजी भैय्या नेहमीच विविध मंदिरे आणि दर्ग्यांना आवर्जून भेटी देत असतात. अध्यात्मावरील ठाम विश्वासाने ते नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांना, जीवनातील शाश्वत सुखासाठी भक्तिमार्गाचा संदेश देत असतात.         

बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असलेले आमदार संभाजी पाटील निलंगेकर हिंदू धर्मा प्रमाणेच इतर धर्मियांतील पवित्र स्थानांना देखील भेटी देत असतात. लातूर येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत सुरत शहावली दर्ग्यास भेट देऊन चादर अर्पण करतात. येथे भेट दिल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. याचा ते नेहमी उल्लेख करतात. आमदार संभाजी भैय्यांनी कोरोनाकाळात कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे तसेच सामान्य जनतेच्या हिताचे कार्य जलद गतीने व्हावे यासाठी मनोभावे प्रार्थना करत लातूरचे ग्रामदैवत असलेल्या भगवान सिद्धेश्वर रत्नेश्वरांचे दर्शन घेतले होते. लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले श्री रेणुका मातेचे मंदिर. आई रेणुका मातेच्या दर्शनासाठी आमदार संभाजी भैय्या भक्तिभावाने जात असतात. रेणुका मातेला आपल्या लेकरांवर अर्थातच आपल्या जनतेवर लक्ष ठेवण्याची मनोभावे प्रार्थना करतात. 

आपल्या नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात ते दरवर्षी तिरुपती येथे जाऊन भगवान बालाजीच्या दर्शनाने करतात. आपल्या मुलांसह व परिवारासह खर्ची करायला मिळणारा अगदी थोडा वेळ शक्यतो अशा सात्विक, भक्तिमय वातावरणात व्यतीत करणे पसंत करतात. भगवान बालाजीच्या कृपेने संभाजी भैय्यांना नेहमीच जनसेवा करण्याचा प्रसाद मिळत असतो. आमदार संभाजी भैय्या वर्षातून किमान एकदा तरी महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतात. आपल्या महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर करून सुखसमृद्धीसाठी भवानीमातेला साकडे घालतात. आई तुळजाभवानी त्यांना नेहमीच मानसिक बळ प्रदान करत असते.

“अशक्य ही शक्य करतील स्वामी” या विश्वासाने सकारात्मक कार्याची प्रेरणा जिथे सर्वांना प्राप्त होते अशा श्री स्वामी समर्थ केंद्राच्या प्रार्थना सभागृहाचे उद्घाटन आमदार संभाजी भैय्यांच्या उपस्थितीत निलंगा येथे करण्यात आले. स्वामींचा भक्त समुदाय महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यामध्ये दूरवर पसरलेला आहे. श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद व पूजनीय श्री. मोरे दादा यांच्या प्रेरणादायी विचारांनी प्रभावित भाविक सकारात्मकतेने या ठिकाणी एकत्र येतात. स्वामींच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आमदार संभाजी भैय्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक वाटतो. समाजसेवेच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी स्वामींच्या दिवत्वाची त्यांना नेहमीच प्रचीती येत असते. समाजकल्याणकारी परियोजनांचं कार्य करण्यासाठी आध्यात्मिक साधना बळ देते.

सामान्य माणसांच्या समस्यांना दूर करण्यासाठी आमदार संभाजी भैय्यांना असेच सामर्थ्य लाभो. आपल्या कृतीतून सामाजिक आणि धार्मिक संबंध मजबूत करून एक आदर्श समाज निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास सफल संपूर्ण होवो. हीच सदिच्छा!  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *