इस्त्रोची नेत्रदीपक कामगिरी!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गेल्या दहा वर्षात अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. या नेत्रदीपक कामगिरीमुळे जागतिक अंतराळ समुदायातील एक प्रमुख खेळाडू म्हणून भारताचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. भारत सरकारच्या अधिपत्याखाली अंतराळ संशोधन करण्यासाठी १९६९ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. “मानवी सेवेसाठी तंत्रज्ञान” हे  ब्रीदवाक्य घेऊन सुरु झालेली ही संस्था आज जगभरात भारताचे नाव उंचावत आहे. संपूर्ण विश्वातील लोक आज इस्रोकडे कौतुकाने बघत आहेत. या गोष्टीचा देशातील प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो.

भारत हा साप गारुड्यांचा देश आहे, अशी खिल्ली एकेकाळी ब्रिटीशांसह पाश्चात्य लोक उडवत असत. पण आज याच देशातील गुणवान शास्त्रज्ञांनी इतिहास घडवला आहे. मागील दहा वर्षात आपल्या देशाने विविध क्षेत्रात अतिशय वेगवान प्रगती साधली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात आपल्या देशाने एक मोठा टप्पा गाठला आहे. इतर देशात जिथे आजही 2 G वर मोबाईल सेवा चालते तिथे आपल्या देशात मात्र तीच मोबाईल सेवा 5 G वर सुरु आहे. यामुळे देशातील नागरिकांना वेगवान इंटरनेटचा लाभ प्राप्त झाला आहे. हे भारताने केलेल्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीमुळे शक्य झाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गेल्या दशकात 397 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत आणि या कामातून तब्बल USD 441 दशलक्ष कमावले आहेत. इस्त्रोने आजपर्यंत, 432 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत त्यापैकी 397 (91 टक्के) गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत प्रक्षेपित केले गेले आहेत.

इस्रोसाठी एक ऐतिहासिक कामगिरी म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 यानचे यशस्वी सॉफ्ट-लँडिंग. यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग मिळवणारा भारत पहिला देश बनला आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंग पूर्ण करणारा जगातील चौथा देश बनला आहे. या मोहिमेचा मूळ उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा शोध घेणे हा होता. यामुळे भविष्यात चंद्र वसाहतीसाठी नवीन जागा शोधणे सोपे होणार आहे. याच प्रमाणे आणखी एक महत्वाचे मिशन म्हणजे आदित्य-L1. ही विशेष मोहीम सूर्याच्या सर्वसमावेशक अभ्यासावर लक्ष केंद्रित करून सौर निरीक्षणामध्ये भारताच्या अग्रगण्य प्रवेशाला चिन्हांकित करणारी ठरली. देशासाठी अंतराळातील ही पहिली समर्पित सौर वेधशाळा म्हणून महत्त्वपूर्ण आहे. ही मोहीम अंतराळ संशोधन क्षमतेत भारताची मोठी प्रगती दर्शवते. आदित्य-L1 मुळे सौर घटनांचे विश्लेषण करणे सोपे जाणार आहे. मानवी अंतराळ उड्डाणाचे सुरक्षित संचालन करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून गगन यान नामक मोहीम राबवली गेली आहे. गगन यान मोहिमेच्या यशस्वी उड्डाणामुळे ही क्षमता बाळगणाऱ्या निवडक देशांच्या गटामध्ये भारत पोहचला आहे. त्याच बरोबर, इस्त्रोने पुन्हा वापरता येण्यायोग्य प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानासह शाश्वत अंतराळ संशोधनात लक्षणीय प्रगती केली आहे. या तंत्रज्ञानाचा यशस्वी विकास आणि प्रात्यक्षिक इस्त्रोची अत्याधुनिक, शाश्वत अंतराळ तंत्रज्ञानाप्रति  वचनबद्धता अधोरेखित करते आणि जागतिक अंतराळ संशोधन क्षेत्रात तिची भूमिका पुढे नेत आहे. देशाच्या अंतराळ क्षेत्रातील हा गगनभेदी आलेख असाच उंचावत जावो. हीच मंगलकामना!