blog

घोटाळे दमदार… सूडबुद्धी जोमदार…

घोटाळे दमदार… सूडबुद्धी जोमदार…

मतदारांशी अप्रामाणिक राहात, समाजहितापेक्षा आपला स्वार्थ कसा साधता येईल याचे काटेकोर नियोजन करून सत्तेवर आलेल्या बिघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव सत्तापिसासू पक्ष आणि नेते आज साजरा करीत आहेत. पण प्रत्यक्षात हा आनंदोत्सव कोविडग्रस्तांच्या मृतदेहांवर, विविध घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर, मुजोरी आणि सूडबुद्धीच्या लाटेवर साजरा होतो आहे, याचे भान सत्ताधारी विसरले आहेत.

आपला स्वार्थ साधण्यात या तीनही पक्षांच्या नेत्यांना यश आले आहे, हे सत्य नाकारण्यात काहीच अर्थ नाही. पाच वर्षे सत्तेपासून वंचित राहिल्यानंतर येणार्‍या बुभुक्षित वृत्तीचा परिचय प्रत्येक जण देत आहे. मोठ्या योजनांतील घोटाळे, चांगल्या उपक्रमांना स्थगिती देऊन त्यात केलेला सेटलमेंटचा प्रयत्न ते गावोगावपर्यंत पोहोचलेली रस्त्यावरची वसुली या प्रत्येक आघाडीवर हे सरकार आपल्या अन्यायपूर्ण वर्तनाचा परिचय देतच आहे. सामान्य माणूस मात्र हतबलतेने पण मनातील क्रोध दाबून ठेवून हा उद्धटपणा पाहात आहे. तो योग्य वेळी या सत्तातुरांना प्रत्युत्तर देईलच.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पवित्र नाव दिलेल्या ‘शिवभोजन’ योजनेच्या अनुदानात घोटाळा, कोरोनाचे मृतदेह वाहून न्यावयाच्या बॉडी बॅग्समध्ये घोटाळा, अक्षरशः मढ्याच्या टाळूरवरचे लोणी खाणारा ई पास घोटाळा, कसलाही तांत्रिक आधार नसलेला वाढीव वीजबिल घोटाळा, सत्तेवर येताना शेतकर्‍यांचे नाव घेतलेल्या सरकारचा शेतकर्‍यांना नागवणारा बोगस बियाणे घोटाळा, सामान्य माणसांची लूट करणारा कोरोना चाचणी घोटाळा… या सरकारच्या स्वार्थीपणाची आणि घोटाळ्यांची यादी खूप मोठी होऊ शकते.

हे खरे तर अपयशी सरकार आहे. राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार न टाकता फडणवीस सरकारने आखलेल्या लोक कल्याणकारी योजनांना सरसकट स्थगिती देण्यात या सरकारला पुरुषार्थ वाटला. प्रत्येक आघाडीवर हे सरकार अपयशी ठरलेले आहे. शेतकर्‍यांवरील अन्याय वाढले, शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले. कोरोनाचे संकट या सरकारला अजिबात हाताळता आले नाही. प्रशासन, गृहखाते, अंमलबजावणी, सारे काही अयशस्वी…

मराठा समाजाला फडणवीस सरकारने कायद्यात बसणारे आरक्षण मिळवून दिले, पण या नाकर्त्या सरकारने त्याची वासलात लावली. महत्वाची बाब ही आहे की यांचे थोर सल्लागार मराठा समाजाचे हितरक्षक म्हणवतात. हा दुतोंडीपणा आता मराठा समाजाने ओळखला आहे. सरकारने लोकहिताचे अक्षरशः एकही काम केलेले नाही. समुद्रातील शिवरायांचे भव्य स्मारक असो की इंदुमिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक… यांनी कुठेही लक्षणीय कामगिरी केलेली नाही.

फक्त एका बाबतीत मात्र हे सरकार यशस्वी ठरले. सूडबुद्धी आणि विकृत निर्णय…! मा. उच्च न्यायालयानेही कंगना रानावत यांच्या प्रकरणात याच शब्दांत टीकास्त्र ओढले आहे. ‘आम्ही करतो तेच योग्य. त्या विरुद्ध बोलाल तर याद राखा. आम्ही खोटेनाटे आरोप लावू, तुरुंगात डांबू, जेसीबी लावून घर उध्वस्त करू, हल्ले घडवून आणू…’ हा संदेश स्पष्टपणे देण्यात या सरकारला नक्कीच यश आलेले आहे. पण हे यश या सरकारला अधिकाधिक गाळात घेऊन जाणारे ठरेल.

हे ‘वर्क फ्रॉम होम’ सरकार लवकरात लवकर पायउतार होवो आणि या राज्याला खरोखरीच प्रगतीपथावर नेणारे, समाजाने मागील निवडणुकीत ज्यांच्या नेतृत्त्वाला स्पष्ट कौल दिलेला होता त्या मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरात लवकर सत्तेवर येवो, हीच ‘ठाकरे सरकार’साठी या राज्याने दिलेली योग्य शुभेच्छा ठरेल…