चीनी ड्रॅगनच्या विळख्यात सोन्याचा दर  

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीने फार मोठी उसळी मारल्याचे दिसत आहे. चीन सारख्या देशाने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्याचे दिसत आहे. जागतिक बाजारपेठेचा अभ्यास केला असता लक्षात येते, की चीनची अमेरिकेशी स्पर्धा सुरु आहे. सध्या जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून अमेरिका प्रथम स्थानावर आहे. तर चीन दुसऱ्या स्थानावर आहे. चीनला अमेरिकेच्या डॉलरला मागे टाकून पुढे जायचे आहे. त्यासाठी चीनला युआन या आपल्या राष्ट्रीय चलनाचे मोल वाढवणे गरजेचे आहे. कोविड महामारीनंतर आर्थिक संकटात सापडलेली चीनची अर्थव्यवस्था अद्यापही म्हणावी तशी सशक्त नाही. अशातच मागील तीन चार महिन्यात चीन सोन्याची प्रचंड मोठ्या प्रमाणत खरेदी करून ठेवत असल्याचे समोर आले आहे.

ताज्या आकडेवारीनुसार नुकत्याच संपलेल्या मार्च महिन्यात सुमारे ५ टन सोन्याची आयात चीनने केली आहे. २०२४ मध्ये पहिल्या तीन महिन्यांचा विचार करता चीनने तब्बल २७ टन इतकी खरेदी केली आहे. यामुळे सध्याच्या घडीला चीनकडे एकूण २२६२ टन इतका सोन्याचा साठा आहे. जागतिक बाजारपेठेत चीन इतक्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करू लागल्याने इतर देशातही सोन्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. याचाच परिणाम म्हणून आपल्या देशातही सोन्याने ७० हजारांचा टप्पा गाठला आहे. कोरोना महामारीपूर्वी संपूर्ण जगातून चीनने विविध वैद्यकीय साधनांची अचानक खरेदी सुरु केली होती. त्यावेळी त्या खरेदीमागचे कारण कोणाला उमगले नव्हते. पण कोरोनाचा जसा प्रभाव वाढत गेला तसा या खरेदीमागचा अर्थ लक्षात आला.

खरंतर कोणत्याही देशाकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यावरून त्या देशाच्या अर्थव्यस्थेचा अंदाज बांधला जातो. जितके सोने जास्त तितकी अर्थव्यवस्था भक्कम असे मानले जाते. दरम्यान भारताने देखील मागील ३-४ महिन्यात साधारण १४ टन सोन्याची खरेदी केली आहे. जागतिक पटलावरील युद्धजन्य परिस्थिती बघता प्रत्येक राष्ट्र स्वतःची अर्थव्यवस्था शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. रशिया-युक्रेन तसेच इराण-इस्राइल युद्धामुळे वाढत्या असुरक्षितेच्या भावनेमुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक राष्ट्रे सोने खरेदी करत आहेत. अनेक इस्लामिक देश, लॅटीन अमेरिकेतील देश, आफ्रिकन देश, विकसनशील आणि गरीब देश सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसून येत आहेत. याचा परिणाम सध्या सर्वत्र सोन्याचे भाव वधारण्यावर झाला आहे. याचाच अर्थ सोन्याचे दर वाढण्यामागे आपले सरकार जबाबदार नसून चीनने अचानक केलेली खरेदी कारणीभूत आहे