जल साक्षरता रॅली का आणि कशासाठी ?
मित्रांनो, लातूर जिल्ह्याने या राज्याला आणि देशाला खूप काही दिल आहे. परंतु आजही या जिल्ह्याला पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत आहे. पाणी नाही म्हणून अपेक्षित शेतीला उत्पन्न नाही. उत्पन्न नाही म्हणून उद्योग नाहीत. आणि उद्योग नाही म्हणून रोजगार नाही. या परिस्थितीला वैतागून आपली तरुण पिढी गाव सोडून पुण्या-मुंबईला जात आहेत. गावे ओस पडतायेत. आपणच आपल्या माणसांना दुरावतोय.
हे चित्र बदलायचं असेल तर आपल्या जिल्ह्याचे हक्काचे पाणी आपल्याला आणावे लागेल. जिल्ह्यात उद्योग आणि रोजगाराला चालना द्यावी लागेल. यासाठी सरकार दरबारी आपल्या हक्काचे पाणी जे समुद्रात वाहून जात आहे ते मागावे लागेल. पण सरकार एकट्या दुकट्या माणसाच ऐकणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांची मागणी करावी लागेल तरच ती सरकारच्या कानापर्यंत पोहोचेल.
त्यासाठी प्रत्येक लातूरकराला जागे करण्याचे काम आपल्याला कराव लागेल. आणि त्यासाठीच जल साक्षरता रॅलीचे आयोजन केले आहे. जिल्ह्यसमोर असलेले प्रश्न लोकांना सांगून त्यांना आपल्या हक्काची जाणीव करून द्यावी लागेल. आणि त्यासाठी आवाज उठवण्याचे बळ त्यांना द्यावं लागेल.
मित्रांनो, ध्यानात घ्या. आपला दुष्काळ हा आपणच आपल्यावर ओढवून घेतला आहे. आपल्या हक्काचे पाणी आणले आणि त्याचे योग्य नियोजन केले तर लातूर जिल्ह्याला कधीही दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. म्हणून आपल्या हक्काच्या पाण्यासाठी या रॅलीत सहभागी व्हा. आपले भविष्य आपल्याच हातात आहे, हे ध्यानात ठेवा.


