दर्जेदार महामार्ग निर्माण करणारा परीसस्पर्श – नितीनजी गडकरी

लोकसभा २०२४ च्या रणधुमाळीमध्ये नुकतीच लातूरला केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांची विराट सभा पार पडली. देशभर दर्जेदार महामार्गांचे जाळे निर्माण करणाऱ्या गडकरी साहेबांना ऐकणे म्हणजे नेहमीच पर्वणी असते. रस्तेनिर्मितीमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारे अजातशत्रू नेते, देशाचे विकासपुरुष मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेब म्हणजे राजकारणातील विद्यापीठ आहे. गडकरी साहेब आपल्या भाषणातून नेहमीच वेगवेगळ्या कल्पक योजना सांगत असतात. ते कधी हायड्रोजन कारचे महत्व आणि येत्या काळातील त्याची गरज सांगत असतात. तर कधी शेतकरी बांधवांनी इथेनॉलची शेती करण्याचा आग्रह धरतात. अशा कल्पना सांगण्यामागे गडकरी साहेबांची एकच प्रामणिक इच्छा असते, माझा प्रत्येक देशबांधव आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा.  

महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री पदावर काम करत असताना गडकरी साहेबांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या बांधकामाला गती दिली. गडकरी साहेबांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतरच या प्रकल्पाचे बांधकाम जलदगतीने सुरू झाले.  MSRDC कडे मुंबईपुणे एक्स्प्रेस वेच्या बांधकामाचे काम 30 वर्षांसाठी टोल वसूल करण्याच्या परवानगीने बांधा-चालवा-हस्तांतरण करा या तत्त्वावर सोपवले. त्यांच्या याच दूरदृष्टीने त्यांनी आजवर देशभर अनेक उड्डाणपूल आणि महामार्गांचे काम पूर्ण करून दाखवले आहे. त्यांच्या कामातील प्रामाणिकता बघूनच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्यावर देशातील साडेसहा लाख खेड्यांना रस्त्यांनी जोडण्याची जबाबदारी सोपवली. त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली. पुढे एका मागोमाग एक अशा विविध महत्वाच्या कामांतून गडकरी साहेबांनी स्वतःचा एक नावलौकिक निर्माण केला. आज दर्जेदार रस्ते म्हणजे गडकरी साहेब असे समीकरण जनमानसात रूढ झाले आहे. हे यश आहे त्यांच्या प्रामाणिक कष्टांचे.    

आपल्या लातूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम् करण्यासाठी तसेच या भागातील शेतकरी बांधवांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी त्यांनी अनेक कल्पक योजना आपल्या भाषणात सांगितल्या. लातूरच्या विकास कामांसाठी मी कायम वचनबद्ध असल्याची ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली. गेली अनेक वर्षे विकासाची वाट बघत असलेल्या लातूर-बार्शी महामार्गाचे चौपदरीकरण लवकरच सुरु करणार असल्याची घोषणा यावेळी गडकरी साहेबांनी केली. तसेच लातूर-नांदेड रेल्वेमार्गाला गती देण्यासाठी देखील पाठपुरावा करण्याचा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला. यापुढे भविष्यात लातूर आणि निलंगा मतदारसंघातून येणारे प्रत्येक कार्य आपण पूर्ण करू, असा विश्वास गडकरी साहेबांनी व्यक्त केला. मला या गोष्टीचा मनस्वी आनंद वाटतो की, संपूर्ण देशात ज्यांच्या नेतृत्वाने दर्जेदार रस्त्यांची निर्मिती झाली, अशा गडकरी साहेबांना आपल्या लातूर जिल्ह्याबद्दल विशेष प्रेम आहे. मला खात्री आहे, आगामी काळात गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या लातूर जिल्ह्याच्या विकासकामात वेगाने वृद्धी होईल.