नॅशनल क्रिएटर अॅवार्डस – गुणवान तरुणाईचा सन्मान

नॅशनल क्रिएटर अॅवार्डस – गुणवान तरुणाईचा सन्मान

सध्याच्या मोबाईलच्या जमान्यात डिजिटल क्रिएटर्स किंवा इन्फ्लुएन्सर्सचे प्रचंड आकर्षण आहे. त्यांचा प्रभाव आणि वेगळ्या क्षेत्रातील मुशाफिरीची सरकारलाही भुरळ पडली आहे. तरुण मुलामुलींपासून अगदी घरातील सिनिअर सिटीझन्स पर्यंत सर्वांना या क्रिएटर्स मंडळींनी वेड लावले आहे. आशयघन कंटेट निर्मिती तयार करणारी ही सारी गुणवान मंडळी म्हणजे देशाची भूषण आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर यांना ख्याती मिळाली आहे. यातील काहीजण वेगेवेगळ्या ठिकाणी भटकंती करण्यात माहीर आहेत. तर काही टेक्नोसॅव्ही मंडळी विविध आधुनिक वस्तूंविषयी इत्यंभूत माहिती देण्यात “टेकगुरु” आहेत. डिजिटल दुनियेतील या गुणी लोकांनी आपले स्वतःचे असे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे.  

पंतप्रधान मा.ना. नरेंद्रजी मोदी हे नेहमीच युवकांना प्रोत्साहन देत असतात. आपल्या भाषणात ते नेहमी म्हणतात, भारतात जगातील सर्वात मोठी युवाशक्ती आहे. या युवा शक्तीतील कलागुणांना योग्य दिशा दिली तर देशासाठी अनेक नवनवीन गोष्टी आकाराला येऊ शकतात. नुकताच पंतप्रधान मोदिजींच्या शुभहस्ते नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड सोहळा पार पडला. सोशल मिडीयावर आपली क्रिएटीव्हीटी वापरून कंटेट बनवणाऱ्या लोकांना अशा प्रकारे पुरस्कार देण्याची ही पहिलीच वेळ होती. नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये हा पुरस्कार सोहळा थाटामाटात पार पडला. या सर्व डिजिटल क्रिएटर्सना यथोचित सन्मानित करण्यात आले. आपल्या विविध प्रकारच्या कंटेटमधून हे सर्व डिजिटल क्रिएटर्स एक प्रकारे ज्ञान प्रसाराचे कार्य पार पाडत आहेत. त्यांनी सादर केलेल्या गोष्टींतून अनेकांना नवीन माहिती, नवा विचार, नवी उमेद मिळत आहे.     

कथाकथन, सामाजिक बदलांवरील भाष्य, पर्यावरणीय बदल, शिक्षण आणि गेमिंग यासह विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीला ओळख देण्यासाठीचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. विविध २० प्रकारांमध्ये पुरस्कार देण्यात आले. यामध्ये बेस्ट स्टोरी टेलर, द डिसर्पटर, सेलिब्रेटी क्रिएटर, ग्रीन चॅम्पिअन, दि बेस्ट क्रिएटर फॉर सोशल चेंज, मोस्ट इम्पॅक्टफुल अॅग्री क्रिएटर, कल्चरल अॅम्बेसिडर, बेस्ट ट्रॅव्हल क्रिएटर, न्यू इंडिया चॅम्पियन, टेक क्रिएटर, हेरिटेज फॅशन, मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर, बेस्ट क्रिएटर इन फूड कॅटेगिरी, दि बेस्ट क्रिएटर इन एज्युकेशन आणि आंतरराष्ट्रीय क्रिएटर अॅवॉर्ड अशा विविध पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे. आपल्या हरहुन्नरी गुणांनी लोकांचे मनोरंजन करणाऱ्या या गुणवंतांना संधींचे अमर्याद आकाश लाभो, हीच मंगलकामना!