भूमिपूजन: नव्या संधींचे आणि विकासाचे..!

मराठवाडा रेल्वे कोच कारखाना हा विकासाबरोबरच आणखी एका गोष्टीसाठी ओळखला गेला तो म्हणजे ‘गती’. प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आतच या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. देशाचे तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री मा.श्री. पियुषजी गोयल आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच लाखो लातूरकरांच्या साक्षीने हा भूमिपूजन सोहळा ३१ मार्च २०१८ रोजी प्रकल्पस्थानी पार पडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची कास धरत ते वेगाने आणि कौशल्याने पूर्ण करण्याचे सूत्र अवलंबले आहे. त्यातही देशातील मागास आणि दुष्काळग्रस्त भागांचा अधिक विकास करण्यावर त्यांनी भर दिला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा प्रकल्प लातूरला मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करून अक्षरशः माझे डोके खाल्ले त्यामुळे मराठवाड्यामध्ये हा प्रकल्प येऊ शकला, अशी भावना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

तसेच मराठवाडा आणि विदर्भ या दोन प्रदेशांना कायमच विकासाच्या पंगतीमध्ये उपेक्षिले गेले आहे. त्यामुळे राज्य सरकार हे या दोन भागांच्या विकासासाठी कटिबद्ध असून मराठवाड्याचा विकास हे आमच्या मुख्य अजेंड्यावर आहे, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केली.

मराठवाड्यातील कष्टकरी जनतेला या कारखान्यामुळे हक्काच्या रोजगाराचे द्वार उघडले आहे, असे भावना उद्गार तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केल्या. मराठवाड्याच्या ६० वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतका मोठा सरकारी प्रकल्प मराठवाड्याला त्यातही लातूरला मिळाला. यामुळे आता रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबून येथील तरुण पिढीला रोजगार मिळेल. तसेच आसपासच्या भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.