महाराष्ट्राची आधुनिक लालपरी

१ जून १९४८ महाराष्ट्राच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस मानला जातो. याच दिवशी आपल्या राज्यातील राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस “पुणे-अहमदनगर” या मार्गावर धावली होती. १ जून २०२३ ला या घटनेला तब्बल ७५ वर्षे पूर्ण झाली. मित्रांनो आपल्या लालपरीने गेली ७५ वर्षे ऊन, वारा, पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता अखंडितपणे जनतेला सेवा पुरवली. असं म्हणतात चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गाव खेड्यापासून अगदी आदिवासी पाड्यापर्यंत एसटी धावते. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीद घेऊन आपली लाडकी लालपरी अविरत सेवा पुरवत आहे. आपल्यापैकी अनेकांच्या शालेय जीवनाच्या आठवणी याच लालपरी भोवती फिरतात. तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुला-मुलींसाठी एसटी जिव्हाळ्याचा विषय आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी असणाऱ्या मुलांना जेवणाचे डबे पोहचवणे, गावागावात वर्तमानपत्राचे गठ्ठे पोहचवणे अशा कितीतरी गोड आठवणी लालपरी सोबत जोडल्या आहेत. काळ बदलून आर्थिक सुबत्ता आली. अनेक घरांमध्ये चार चाकी वाहने दिसू लागलीत, तरी आजच्या काळातही लाल परीचे महत्त्व बिलकुल कमी होत नाही. 

शालेय विद्यार्थी मित्रांसाठी मासिक पास योजना, दिव्यांग बांधवांसाठी विशेष सवलत, जेष्ठ नागरिक व महिलांना ५० % सवलत एसटी देत आहे. अशा तब्बल ३० पेक्षा जास्त घटकांना महायुती सरकारने एसटीच्या माध्यमातून लाभ दिला आहे. अशा प्रकारे सवलती देणारी लालपरी अनेकांसाठी आधार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या स्थानकांचा कायापालट व्हावा यासाठी एसटी महामंडळाने स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प केला आहे. “आपलं गाव, आपलं बसस्थानक” या संकल्पनेवर आधारित अभियानाद्वारे आता गावा शहरातील बस स्थानकांचा कायापालट होण्याची एक व्यापक चळवळ निर्माण झाली आहे. मित्रांनो आपली लालपरी आता हळूहळू आपले रुपडे बदलत आहे. अद्यायवत सेवांनी सजलेली लालपरी आता प्रवाशांना सेवा देण्यासाठी तत्पर आहे. प्रवाशांना आरामदायी अनुभव देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने नुकत्याच १००० नवीन बसेसची खरेदी केली आहे. आधुनिक सुविधांनी सजलेल्या या बसेसची संख्या आगामी काळात वाढवून प्रवाशांना आनंददायी प्रवासाचा अनुभव देण्याचा एसटीचा मानस आहे.           

संपूर्ण जगामध्ये वाढणारा ग्लोबल वार्मिंगचा धोका लक्षात घेऊन जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे गरजेचा आहे. पर्यावरण पूरक, प्रदूषण मुक्त नवीन ऊर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करणे जरुरीचे ठरते. याच पर्यावरण पूरक विचाराने प्रेरित होऊन एसटीने भविष्यासाठी तब्बल ५१५० इलेक्ट्रिक वाहने आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा निश्चय केला आहे. मित्रांनो आपली एसटी लवकरच कॅशलेस होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यापुढे आधुनिक UPI प्रणालीद्वारे तिकिटांचा वापर वाढणार आहे. याची सुरवात अलीकडेच सर्व स्थानकात सुरवात झाली आहे. याच बरोबर प्रवाशांच्या सुविधेसाठी आरक्षण प्रणालीमध्ये देखील आमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी सेवेची ही अखंडित परंपरा भविष्यात शतकोत्तर महोत्सव साजरा करेल; यात काडीमात्र शंका नाही.