माझ्या नजरेतून प्रोजेक्ट आनंदी

एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात काम करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपल्या देशात आजही महिलांच्या आरोग्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. विशेषतः ग्रामीण भागातील चित्र जास्तच विदारक दिसते. अनेक घरात पाचवीला पुजलेले दारिद्रय असते मग आरोग्याबाबत सेवा साधनांची तिथे काय व्यथा. महिलांच्या या समस्या बघून मला खूप दिवसांपासून व्यथित व्हायला व्हायचं. मग एकदा आईने अर्थात अक्कांनी मला सांगितले, महिलांच्या अडचणी सोडवत असताना त्यांच्याकडे फक्त वडिलांच्या नजरेतून बघू नकोस तर आईच्या नजरेतून बघ. तरच तुला खऱ्या अर्थाने मुलींच्या अडचणी समजतील. माझ्यासाठी अक्कांचा विचार प्रेरणादायी ठरला. त्यातूनच जन्माला आली प्रोजेक्ट आनंदीची संकल्पना. अक्का फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून विविध सामाजिक सेवाकार्य केले जात होते. परंतु माताभगिनींसाठी कार्य करणारी “आनंदी” ही अक्का फाऊंडेशनची पहिलीच अभिनव संकल्पना आहे.

माझी बहीण प्राजक्ता एकदा मला म्हणाली, भैय्या आपल्या लातूरमध्ये एक लाख ३८ हजार मुली सहावी ते बारावी वर्गात शिकणाऱ्या आहेत. तुला त्या तमाम मुलींचा मोठा भाऊ बनून काम करावे लागेल. कारण शाळेत असताना मुलींना मासिकपाळी विषयी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपल्या समाजातील पारंपारिक विचारसरणीमुळे मुली अशा गोष्टी घरात मोकळेपणाने बोलत नाहीत. मासिक पाळीच्या अज्ञानामुळे मुलींना आरोग्याबाबतच्या अडचणी निर्माण होतात. तिच्या सांगण्यावरून एक गोष्ट लक्षात आली. आपल्या समाजात आजही पुरुषवर्गाला महिलांच्या समस्यांबद्दल विशेष स्वारस्य नाही. मला वाटते पुरुषांनाही महिलांची वेदना समजायला हवी. तिच्या दुःखाची भाषा त्याच्या पोलादी मनाला उमगायला हवी. तरच आपण एक संवेदशील माणूस म्हणून जगण्यास पात्र आहोत. माझी बहीण म्हणून तिच्या भोवती जसे माझ्या सुरक्षेचे कवच असते. तसेच सुरक्षेचे, मायेचे कवच लातूरमधील प्रत्येक भगिनी भोवती असावे. अशी तिची प्रांजळ इच्छा तिने माझ्याकडे व्यक्त केली. तेव्हाच ठरवले आजपासून आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तरुणी “आनंदी” असेल. तिच्या आरोग्यासाठी काहीतरी शाश्वत असे कार्य सुरु करायचे.  

४ जून २०२२ रोजी आदरणीय अक्कांच्या शुभहस्ते आनंदीच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. आज आनंदीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वाड्या वस्तींवर तसेच शाळा कॉलेजमध्ये जाऊन आरोग्याविषयी समुपदेशन केले जात आहे. मासिक पाळी विषयी असलेल्या पूर्वग्रहदूषित मतांना वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञ मंडळींकडून उत्तरे देऊन गैरसमज दूर केले जात आहेत. मला वाटते आपल्या देशाची स्त्री जन्मतः सक्षम आहे. परंतु आपल्या बुरसटलेल्या विचारांमुळे आपण तिला परंपरेच्या जोखडामध्ये अडकून ठेवले आहे. समाजाची, देशाची प्रगती होण्यासाठी महिलांच्या पंखात बळ देणे आवश्यक आहे. तिच्या कर्तृत्वाच्या कक्षा तेव्हाच रुंदावल्या जाऊ शकतात जेव्हा तिला आरोग्यपूर्ण स्वस्थ जीवनशैली बहाल करू. निसर्गाने महिला वर्गाला दिलेले वरदान मासिक पाळीच्या रूपाने प्रत्येक महिन्याला अनुभवत असते. पण हेच वरदान काही मुलींना नकोसे आणि लाजिरवाणे वाटते. या विषयावर आपल्याकडे हवा तेवढा संवाद होत नाही. हाच संवाद घडवण्याचा आनंदीचा प्रयत्न असणार आहे. समाजातील सुधारणा करून प्रत्येक मुलीसाठी आनंदी वातावरण निर्माण करणे हेच आनंदीचे उद्दिष्ट आणि मिशन आहे.  

येत्या काळात प्रोजेक्ट आनंदीच्या माध्यमातून भगिनींना सॅनेटरी पॅड पोहचवण्याचा मानस आहे. मला हे मिशन त्याही पुढे न्यायचे आहे. आपल्या ग्रामीण भागातील महिलांना सॅनेटरी पॅड बनवण्याच्या व्यवसायातून स्वयंपूर्ण बनवण्याचा मनोदय आहे. माझ्या दृष्टीक्षेपात प्रत्येक भगिनीचा उज्ज्वल भविष्यकाळ आहे. तिच्या आरोग्य विषयक अडचणींना समजून घेऊन तिला योग्य ते वैद्यकीय उपचार प्रदान करून तिला सशक्त बनवायचे आहे. महिलांच्या आरोग्याला सवडीचा विषय नव्हे तर अग्रक्रमाचा विषय बनवायचा आहे. प्रत्येक भगिनीला तिच्या आरोग्याबाबत जागरूक करून तिचे आयुष्यमान उंचवायचे आहे. हा एक संवेदनशील सामाजिक विषय आहे. यासाठी आपणा सर्वांचे समर्थन आणि सहकार्य गरजेचे आहे. माझे सर्व पुरुष वर्गाला आवाहन आहे की महिलांच्या मासिक पाळीच्या कालावधीत त्यांना भावनिक आधार द्या. त्यांना समजून घ्या. मासिक धर्मा विषयी मनातली जळमटे दूर सारून तुमच्या घरातील ‘तिला’ जगण्याचे बळ द्या.