राममंदिर – एक ध्येयप्राप्ती

भारतवासीयांची अस्मिता, भारतवासीयांचा गौरव प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. १४० कोटी भारतवासीयांमध्ये उत्साह संचारणे साहजिकच होते, कारण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत विराजमान होणार होते. केवळ हिंदूच नव्हे तर सर्वधर्मीयांचा सहभाग या कार्यक्रमात पाहायला मिळाला. आपल्या निलंग्यातही मुस्लीम बांधवांनी या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. कारण त्यांनाही विश्वास होता की प्रभू श्रीरामांचे रामराज्य म्हणजे केवळ राज्य नसून ती भेदभावविरहीत लोककल्याणकारी अशी आदर्श राज्य व्यवस्था होती. आणि याच रामराज्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन भारतवर्षातील या मंगल सोहळ्याचे भागीदार झाले.

रामजन्मभूमी अयोध्येत राममंदिर निर्माण कार्यासाठी देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने पुढाकार घेऊन करोडो रामभक्तांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात अडकलेला हा प्रश्न भाजप सरकारने वारंवार पाठपुरावा करून अखेर हा प्रश्न कायदेशीरपणे सोडवला. आणि २०२० मध्ये राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले. २०२४ मध्ये राम मंदिर कामकाज पूर्ण होऊन प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होण्याचा अंदाज होता. २२ जानेवारी रोजी अखेर ती पहाट उजडली, भारतवासीयांसाठी मंगलदिन, अभिमानाचा क्षण आला. देशभरातील सर्व मंदिरे सजली, देशभरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा ऐतिहासिक दिवस दिवाळी म्हणून साजरा करण्यात आला. लाखो देशवासीयांनी फटके फोडले, दिवे लावले आणि एकमेकांना पेढे भरवून प्रभू रामलल्लांचे स्वागत केले. 

देशभरात अयोध्येत ज्याप्रमाणे उत्सव होता त्याचप्रमाणे भारतातील कानाकोपऱ्यात या सोहळ्यासाठी उत्साह होता. अवघी निलंगानगरीही प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सजली होती. धार्मिक स्थळे उजळून निघाली होती. दिवसभर विविध धार्मिक विधी, कार्यक्रम पार पडत होते. यामध्ये सर्वधर्मियांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता असे जाणवत होते की रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा तर झालीच पण आता रामराज्य देखील जास्त दूर नाही.

देशवासियांचा मंगल सोहळा, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा!