संधींचे महाद्वार – नमो महारोजगार मेळावा!

महाराष्ट्राला राजकारणात तसेच समाजकारणात प्रभावी नेतृत्व देणाऱ्या मराठवाड्यातील युवकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. गरज आहे त्यांना नवीन संधींची उपलब्धता करून देण्याची. याच अनुषंगाने नुकताच लातूर येथील महिला तंत्रनिकेतन मैदान येथे नमो महारोजगार आणि करिअर मार्गदर्शन मेळावा’ उत्सहात पार पडला. परिसरातील अनेक युवक युवतींनी आपला उच्चांकी सहभाग नोंदवत या सुवर्ण संधीचा लाभ घेतला. याचा मला निश्चतच आनंद वाटतो. एक लोकप्रतिनिधी म्हणून केवळ माझ्या मतदारसंघातीलच नव्हे तर महाराष्टातील प्रत्येक तरुणाला रोजगार मिळायला हवा, असा माझा नेहमीच आग्रह असतो. आपल्या राज्यातील महायुतीचे सरकार तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यास सदैव कटिबद्ध आहे. हा मेळावा त्याच विचारांचे द्योतक आहे. असे मला नमूद करावेसे वाटते.  

मित्रांनो, या महारोजगार मेळाव्यात तब्बल २४० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तसेच या मेळाव्यातून सुमारे ७ हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. यावेळी उपस्थित तरुणांना अनेक तज्ञ मंडळींकडून व्यवसायाभिमुख गोष्टींचे मार्गदर्शन दिले गेले. व्यवसाय निर्मितीची सुरवात कशी करावी, त्याबाबत आर्थिक सहकार्य कसे मिळवावे याबद्दल देखील माहिती सांगितली गेली. महिला आणि युवतींसाठी याठिकाणी विविध विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. परिसरातील अनेक महिलांनी आणि युवतींनी या संधीचा लाभ घेतला. मराठवाड्यातील युवकांच्या भविष्याला आकार देणाऱ्या ‘नमो महारोजगार आणि करिअर मार्गदर्शन मेळाव्याने येत्या काळात नक्कीच उद्यमशीलता वाढीस लागेल. असा मला आशावाद वाटतो.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी नेहमीच तरुणांना प्रोत्साहन देत असतात. तरुणांच्या हाताला रोजगार दिल्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणार नाही, याचा उल्लेख ते नेहमीच आपल्या भाषणात करत असतात. त्यांच्या याच विचाराने प्रेरित होऊन राज्यातील महायुती सरकारने हा उपक्रम सुरु केला आहे. यापुढेही असे महा रोजगार मेळावे जिल्हास्तरावर आयोजित करून अधिकाधिक तरुणांना याचा कसा लाभ होईल, यासाठी प्रयत्न केले जातील. येत्या काळात नमो महारोजगार मेळाव्याची व्यापकता वाढून तरुणांच्या कल्पकतेला चालना मिळून उद्यमशीलता वाढीस लागेल. असा मला विश्वास वाटतो. नमो रोजगार मेळावा म्हणजे गतिमान महाराष्ट्रासाठी ठरत आहे संधींचे महाद्वार!