सामाजिक समतेचे प्रतिक – जगद्ज्योती बसवेश्वर महाराज

काही माणसे काळाच्या पुढे जाऊन विचार करणारी असतात. आपल्या विचारांच्या बळावर समाजात बदल करण्याचे सामर्थ्य ते अंगी बाळगत असतात. असेच एक थोर विभूती बाराव्या शतकात होऊन गेले. तत्कालीन प्रस्थापित सामाजिक विषमतेविरुद्ध प्रखर लढा देणारे जगद्ज्योती बसवेश्वर महाराज होय. आजही त्यांचे मौलिक विचार समाजाला दिशा दाखवण्याचे काम करतात. राजकीय तसेच सामाजिक जीवनात वावरताना त्यांच्या विचारांचे अनमोल धन मला नेहमीच सन्मार्ग दाखवते. समाजातील सर्वधर्म समभाव जपत, मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांनी केलेले कार्य मानवी जीवनाचा आदर्श वस्तुपाठच म्हणावा लागेल. नुकतीच लातूर येथे बसवेश्वर महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बसवण्णांच्या विचारांचे स्मरण करत एक भव्य शोभायात्रा यावेळी काढण्यात आली होती. यानिमित्ताने समाजातील एकतेचे अभूतपूर्व दर्शन घडले. 

महात्मा बसवण्णांनी आपल्या आचरणातून समाजातील प्रत्येक घटकाने सदाचाराने आचरण कसे करावे, याचा आदर्श निर्माण केला. नितिनियमांचे पालन कसे करावे. अनाचार करू नये. चोरी, क्रोध, राग, स्तुती, मत्सर, आत्मस्तुती करू नये, असे महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वचनाद्वारे समाजाला शिकवले आहे. महात्मा बसवेश्वरांचे साहित्य म्हणजे आयुष्य कसे जगावे याचा एक सर्वोत्तम मार्गदर्शक ग्रंथ आहे. समाजातील प्रत्येक घटकाने महात्मा बसवेश्वर महाराजांचे विचार वाचून आपल्या दैनंदिन जीवनात अंगिकारले पाहिजेत.      

तत्कालीन विषमतावादी समाजात परिवर्तन करत महात्मा बसवेश्वर महाराजांनी व्यवस्थेत आमुलाग्र बदल केला. त्यांनी आपल्या वर्तनातून एकांताकडून लोकांताकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, वैराग्याकडून गृहस्थी जीवनाकडे, कठोरतेकडून सहजतेकडे, शिष्यत्वाकडून शरणजीवनाकडे, अंधश्रद्धेकडून विवेकवादाकडे, ऐतखाऊवृत्तीकडून श्रमवादाकडे, विषमतेकडून समानतेकडे घेऊन जाणारी नवी व्यवस्था निर्माण केली. आपल्या विचारातून एक नवी जीवनपद्धती निर्माण  करणारे बसवण्णा सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. नवा पथ, नवा मार्ग शोधणारे ते एक पथदर्शी होते. अशा थोर समाजसुधारक, जगद्ज्योती, महात्मा बसवेश्वर महाराजांचे विचार अभ्यासून प्रत्येक तरुणाने आपल्या समाजाच्या पर्यायाने देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्नवादी बनले पाहिजे. त्यातूनच खऱ्या अर्थाने महात्मा बसवेश्वर महाराजांना अभिप्रेत असलेला समाज अबाधित ठेऊ शकतो.