100th Divisional Drama Conference, Latur

१०० वे विभागीय नाट्य संमेलन, लातूर

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने नुकतेच लातूर येथे १०० वे विभागीय नाट्य संमेलन अतिशय थाटात पार पडले. या निमित्ताने लातूरकरांनी पाच दिवसीय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीचा मनमुराद आनंद लुटला. प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांचे एकपात्री विनोदी नाटक ‘वऱ्हाड निघालाय लंडनला’, महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकारांचे विनोदी प्रहसन, राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम, धमाल विनोदी सिनेमॅटीक नाटक ‘तूतूमीमी’ तर नृत्य आणि लोकसंगीताने सजलेले आत्मनिवेदनात्मक संगीत नाटक ‘मुक्काम पोस्ट आडगाव” असा मनोरंजनाचा अमाप खजिना याची देही याची डोळा अनुभवला. 

या मंगल प्रसंगी ‘नाटक माझ्या चष्म्यातून’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी सिनेक्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी माझी तसेच लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे आणि आयबीएन लोकमतचे पत्रकार विलास बडे यांची जाहीर मुलाखत घेतली. एकाच व्यासपीठावर कलाकार, पत्रकार, राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांना ऐकण्यासाठी लातूरकरांनी मोठी गर्दी केली होती. शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राला यशाचा पॅटर्न देणाऱ्या लातूर जिल्ह्याने कलेच्या क्षेत्रातही आपले प्रस्थ निर्माण करावे, याबद्दलचा वेध या परिसंवादात घेण्यात आला.

एक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामे करण्याच्या धावपळीत तसे विसाव्याचे क्षण फार कमी मिळतात. तरीही जमेल तसे मराठी नाटक, सिनेमांना आवर्जून जात असतो. समाजातील वस्तुस्थिती मांडण्याचे काम नाटक, सिनेमातून होत असते. आपल्या भाषेतील कलाकृती प्रत्येक मराठी माणसाने बघायला पाहिजेत, कारण नाटक, सिनेमे आपली संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य करतात. या प्रसंगी  सोनालीजींनी आपल्या मिश्कील शब्दात प्रश्न विचारत परिसंवादात रंग भरले. राजकीय क्षेत्रात काम करत असताना नाटक करावे लागते का? या प्रश्नावर दिलखुलासपणे उत्तर देताना सांगितले, राजकीय क्षेत्रात काम करत असताना अनेक गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडत असतात. पण समोर आहे ती परिस्थिती स्वीकारून पुढे जायचे असते. तीच व्यक्ती राजकारणात यशस्वी होते. राजकारणातील लोकांबद्दलच्या जनतेच्या मनातील भावना लेखकांनी आपल्या लेखणीतून मांडल्या पाहिजेत. असे लेखन समाजापुढे यायला हवे. यातूनच एक सुदृढ समाज निर्माण होत असतो. लातूर जिल्ह्यातील कलाकारांना पुढे येण्याची संधी मिळावी यासाठी आपण निकोप स्पर्धा निर्माण करायला हवी. या मुलाखतीच्या निमिताने लातूर शहर आणि जिल्ह्याची नाट्य चळवळ अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काय उपाय करू शकतो यावर चर्चा झाली. लातूरच्या सांस्कृतिक विकासासाठी आपण सर्वजण कायम तत्पर राहू. येणाऱ्या काळात लातूरच्या    कला संपन्नतेला बहुआयामी स्वरूप देण्यासाठी आवश्यक विविध उपाययोजनांची लवकरच आखणी करू. स्थानिक कलाकारांना आपल्या कलेसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या कलेला प्रोत्साहित करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. गुणवंतांच्या या भूमीतून उत्तरोत्तर नवे कलाकार घडत राहो. हीच मंगलकामना!