Loading...

७२ तास अन्नत्याग आंदोलनाचा’ पहिला दिवस अत्यंत आशादायी ठरला.

‘७२ तास अन्नत्याग आंदोलनाचा’ पहिला दिवस अत्यंत आशादायी ठरला. आंदोलनात सामान्य जनता व विविध संघटनांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहून शेतकरी बांधवांच्या पाठीशी मोठी ताकद उभी राहिल्याची जाणीव निर्माण झाली.
नवरात्र उत्सवात शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या लढाईत सहभागी महिला भगिनी या आईभवानीचेच स्वरूप भासत होत्या.. या माता-भगिनिंनी शेतकरी बांधवांसाठी उद्गारलेले शब्द जणू आई भवानीचाच आशीर्वाद आहेत..
आंदोलनात सर्वच वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. शाळकरी मुले, माता, भगिनी, तरुण, वृद्ध इतकेच नव्हे तर दिव्यांग बांधव देखील यात उत्साहाने सहभागी झाले. संपूर्ण दिवस हजारो नागरिक, आप्तेष्ट आंदोलनाला भेट देऊन जात होते.
विविध सामाजिक संघटना पक्षीय बंधने विसरत आंदोलनात सहभागी झाले आहे. आमदार श्री.महादेवजी जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, छावा संघटना, अपंग स्वाभिमानी हक्क प्रतिष्ठान, रयत प्रतिष्ठान अशा अनेक संघटनांनी जाहीरपणे या आंदोलनात सहभाग घेतला.
प्रसिद्धी माध्यमांनी देखील गांभीर्याने दखल घेत सरकारपर्यंत शेतकरी बांधवांचा आवाज पोहोचविण्यासाठी सहकार्य केले.
युवा वर्गाचा उत्साह तर वृद्धांचा आशीर्वाद देखील आंदोलनाचा लढा अधिक व्यापक करण्यासाठी प्रेरणा देत आहेत.
आंदोलनात काही बांधव अनवाणी पायाने तर काही बांधव उध्वस्त पीक हातात घेऊन सहभागी झाले. त्यांचा आक्रोश व यातना बघून मन काही काळ सुन्न झाले. अतिशय विदारक चित्र बघूनही सरकारला पाझर फुटत नाही, हे अनाकलनीय आहे.. शेतकरी बांधव दुःखात आहेत, पण त्यांची साथ देण्यासाठी सर्व जण एक ताकद बनून रस्त्यावर उतरले आहेत, हे चित्र देखील आशादायी आहे.
संपूर्ण दिवस देशभक्तीपर गीते, प्रेरणादायी जयघोष आणि घोषणा यांनी दुमदुमून गेला. सरतेशेवटी कीर्तन आणि भजनाने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांची पूर्तता झाली.
हा संघर्ष बळीराजाला न्याय मिळवून देऊनच थांबेल