अंत्यविधी झाला, जीआर मागे घ्या, अन्यथा श्राद्धही घालू !
जनतेच्या मनाविरुद्ध महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. तेव्हापासूनच या सरकारने सामान्य जनता व व्यापाऱ्यांना वेठीस धरले आहे. हे लोण शेतकरी बांधवांपर्यंत आले आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना मदत देण्यास मोठा विलंब केला. आता एम.एस.ई.बी.च्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. मात्र भारतीय जनता पक्ष हे षडयंत्र कधीही यशस्वी होऊ देणार नाही.
३ व ५ एच.पी. पर्यंत २५,००० रूपये जळालेल्या ट्रान्सफॉर्मरसाठी भरा तरच शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर मिळेल, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. अतिवृष्टीच्या माध्यमातून तुटपुंजे अनुदान शेतकऱ्यांना द्यायचे आणि ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून वसूल करायचे असे हे वसूली सरकार आहे. अतिवृष्टीमुळे अगोदरच शेतकऱ्यांचे खरीप हंगाम वाया गेले आहे. आता शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर असताना महाविकास आघाडी सरकार आपल्या ढिसाळ कारभारामुळे रब्बी ही वाया घालवण्याच्या तयारीत आहे.
राज्य सरकारने शेतकरी विरोधी काळा जीआर मागे घेतला नाही तर त्यांचा विधिवत दशक्रिया विधी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.