औसा येथील विजय मंगल कार्यालयात लातूर भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. यावेळी आगामी निवडणुका, त्यादृष्टीने संघटनात्मक कार्य व मराठवाडा वॉटरग्रीड योजनेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
लातूरसह संपूर्ण मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवू शकणाऱ्या ‘मराठवाडा वॉटरग्रीड योजने’ला गेल्या अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. मराठवाड्याच्या उज्ज्वल भविष्यबरोबरच आघाडी सरकारने एकप्रकारचा खेळ खेळला होता. परंतु यानंतर सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने मराठवाड्याचे हित ओळखून पुन्हा एकदा ही योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन करणारा ठराव आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध करणारा ठराव असे दोन ठराव यावेळी मांडण्यात आले. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील या दोन्ही ठरावांना हात वर करून अनुमोदन दिले.
आगामी काळ हा निवडणुकांचा असून यादरम्यान सर्व कार्यकर्त्यांना शक्ती देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे. केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ मिळावे म्हणून पक्षाने देखील विशेष पाऊल उचलणे अपेक्षित आहे, असे मत व्यक्त केले. याबाबत लातूर जिल्हा भाजपने ठराव करून प्रदेशाकडे पाठवावा, असे आवाहन केले.
जिल्हा कार्यकारिणीची बैठक मंडळ स्तरावर आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एक दिलाने, एकजुटीने, एक मताने आणि एका दिशेने कार्यरत होऊन आपली ताकद एकत्रितपणे दाखविण्याची हीच वेळ असून यानिमित्ताने जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, अशी भावना व्यक्त केली.
