blog

भारताच्या विश्वबंधुत्वभाव आणि धैर्यशीलतेस सलाम !

भारताच्या विश्वबंधुत्वभाव आणि धैर्यशीलतेस सलाम !

आज भारत हा भूतान, मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स या सारख्या देशांना “कोविड-19″च्या लस पुरवत आहे.

भारतीय संस्कृतीचा आत्मा  असणाऱ्या ह्या  “वसुधैव कुटुंबकम” संकल्पनेस आजचा  प्रगत, आधुनिक भारत सार्थ ठरत असल्याचे चित्र प्रकटत आहे. ज्या ऋषी-मुनींनी, तत्त्ववेत्त्यांनी, समाजधुरीणांनी, क्रांतिकारकांनी आपले घर आणि विश्व यात कधीच आपपरभाव न ठेवता एकत्रितरित्या समान वागणूक दिली आणि त्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले, त्यांना सुद्धा आज धन्यता वाटावी असे मौलिक कार्य भारतात होत  आहे. कोरोना सारख्या वैश्विक महामारीच्या काळात सुद्धा भारतासारख्या लोकसंख्येने बलाढ्य असलेल्या देशाची अंतर्गत आरोग्य व्यवस्था सांभाळत शेजारी-मित्र देशांना संपूर्ण सहकार्याची भूमिका भारत सरकार दाखवत आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो व यातूनच वैश्विक बांधिलकीची प्रेरणाही मिळत आहे.

कोविड-19 लस ही आज जगाची गरज होऊन बसलेली आहे. असे….. असताना ही  लस  बनवण्याची  व्यवस्था नसलेल्या देशांचा विचार करून त्या देशांना लस पुरवण्यास केंद्र सरकार कार्यरत आहे. त्यापैकी भूतान
सारख्या काही देशात लस पोहोचल्या सुद्धा आहेत. भारतीयांसह इतर देशांतील नागरिकांच्याही काळजीपोटी अंतर्गत कलहांना सुयोग्य रीतीने सोडवत संतुलन जमवणे हे खरोखरीच विश्वबंधुत्वभाव आणि धैर्यशीलता असल्याशिवाय शक्य नाही.

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्व या गुणांची कुशलता जगाने पाहिलीच आहे. पण आज  लस  पुरवण्याच्या ह्या कृतीतून त्यांच्या दातृत्व आणि मातृत्व ह्या गुणांचे सुद्धा दर्शन घडते आहे. विकासमय परिवर्तनाची कास धरून भारताच्या धैर्यशील विश्वबंधुत्वाच्या भूमिकेला आणि वैश्विक समरसतेच्या या वाटचालीस सलाम !