blog

हा तर सकारात्मकता आणि विकासाचा विजय!

हा तर सकारात्मकता आणि विकासाचा विजय!

बिहार विधानसभा, मध्यप्रदेश – गुजरात – कर्नाटक आदी राज्यांतील पोटनिवडणुका यांचे निकाल आता हाती आले आहेत. सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. बिहारी मतदारांनी या वेळीही अतिशय स्पष्ट कौल देत भारतीय जनता पार्टी आणि जनता दल (युनायटेड) यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाला आणि श्री.नितीशकुमारजी यांच्या मुख्यमंत्रीपदाला मिळालेला हा निःसंदिग्ध कौल आहे.

मध्यप्रदेश, कर्नाटकातील सत्ता परिवर्तनानंतरची ही पहिलीच पोटनिवडणूक होती आणि गुजरातेतही महत्वाचा कौल आजमावला जाणार होता. या सर्व ठिकाणी मतदारांनी भाजपाला उजवा कौल दिला. भाजपा अध्यक्ष श्री.जयप्रकाशजी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री श्री.अमितभाई शाह यांचे झंझावाती दौरे आणि बिहारचे प्रभारी आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय नेतृत्त्व श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या मेहनतीला आलेले हे गोड फळ आहे.

महाराष्ट्रात आपला निष्कलंक कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या देवेंद्रजींना राज्यातील कुटिल, मूल्यहीन आणि पाठीत खंजिर खुपसणार्‍या डावपेचांमुळे मुख्यमंत्रीपदापासून वंचित राहावे लागले होते. त्यांनी आपली ऊर्जा, आपले संघटनकौशल्य बिहारचे प्रभारी म्हणून पुन्हा एकदा सिद्ध केले. प्रत्येकाने सर्वत्र जीव तोडून काम केले. या निवडणुकीत योगदान देणार्‍या प्रत्येकाचा हा विजय आहे. या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

बिहार परिवर्तनशील आहे. येथे बहुतेक वेळा आधीच्या सरकारला पराभूत करण्याची परंपरा चालत आलेली आहे. काही सरकारे पुन्हा सत्तेत आली पण त्यांचे मार्ग लोकशाही विरोधी होते, हिंसक होते. या वेळी बिहारी मतदारांनी मानसिक परिवर्तन घडविलेले आहे. नितिश कुमारजी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा – जेडी(यू) युतीला बहुमत देताना त्यांनी जातीय व धार्मिक आधारावर फूट पाडणार्‍या काँग्रेसी विचारधारेला सीमेबाहेरच थोपविलेले आहे. तोंडदेखले पुरोगामीत्व दूर सारत खर्‍याखुर्‍या पुरोगामीत्वाला, लोकशाहीला बिहारने कौल दिलेला आहे.

श्री.तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखाली आपले घाणेरडे राजकारण खेळून बिहारला पुन्हा एकदा जंगलराजच्या तोंडी देण्याचा काँग्रेसी डाव मतदारांनी वेळीच ओळखला. कर्पुरी ठाकूर, जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या ज्येष्ठांनी ज्या भूमीतील समतेच्या विचारांची मशागत केली तेथे लालूप्रसादांसारखी विषवल्ली उगवलेली होती. ती वेगळ्या रुपाने, त्यांच्या पुत्राच्या रुपाने पुन्हा एकदा फोफावू पाहात होती आणि त्याला खतपाणी घालण्याचे काम काँग्रेसने केलेले होते. हा सारा डाव बिहारी मतदारांनी उधळून लावला. बिहारी माणूस अभिनंदनास पात्र आहे.

या सार्‍या धुमश्चक्रीत बिहारमधील व बिहार बाहेरील काही हौशा-नवशांनीही आपली निवडणुकीची हौस भागवून घेतली. ‘नोटा’पेक्षाही कमी मते आणि सर्वांचीच अनामत जप्त झाल्यानंतर तरी त्यांना समज येईल अशी अपेक्षा वाटते. महाराष्ट्रात आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका तोंडावर आहेत. बदलत्या समाजमनाचे प्रतिबिंब या निवडणुकीतून महाराष्ट्रातही दिसेल, दगलबाजीला मतदार चोख प्रत्युत्तर देतील, याची मला खात्री वाटते.

बिहारमधील निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर भाजपाने दिलेला एक स्पष्ट संदेश मला महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा वाटतो. भाजपा मूल्यांचे राजकारण करते. निवडणुकीआधी भाजपाने नितीशकुमारजी यांना स्पष्ट शब्द दिलेला होता – ‘कोणाच्या कितीही जागा येवोत, मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असतील.’ त्यानुसार, 50 हून कमी जागा असूनही नितीशजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत.

शब्द दिला असेल तर भाजपा तो पाळतोच. तो दिलाच नसेल तर पाळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सत्तेची हाव असलेल्या संधीसाधूंनी कितीही दुष्प्रचार केला तरी ‘ये पब्लिक है, ये सब जानती है’ हेच खरे.