जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक संपन्न झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर व जिल्ह्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शहीदांना अजूनही आवश्यक तो निधी, सन्मान उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. याबाबत चौकशी केली असता सरकारकडून अद्याप त्यांचे शहीद झाल्याचे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने हा सन्मान अजून देण्यात आलेला नाही असे सांगण्यात आले. मात्र ही अतिशय खेदाची बाब असून राज्य सरकारच्या वतीने त्यांना ४८ तासांच्या आत सन्मान प्राप्त होणे आवश्यक असते. याबाबत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना विशेष सूचना करून लवकरात लवकर हा सन्मान मिळवून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
महावितरणाच्या चुकीच्या धोरणांमुळे जिल्ह्यात पाणी असूनही शेतकर्‍यांना पिकांना पाणी देता येत नाही. हे संकट मानवनिर्मित असून याला सर्वस्वी महावितरणाचे अधिकारी जबाबदार आहेत. वाढीव बिलाबद्दल चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत सक्तीची वसुली थांबविण्यात येण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेली विकासकामे जी ९०% पूर्ण झाली आहेत त्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन सर्वसामान्यांच्या सेवेसाठी ही कामे खुली करण्यात यावी, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोना काळात राबविण्यात आलेला डिजिटल एजुकेशनचा उपक्रम अतिशय चांगला झालेला आहे. अशाच प्रकारे डिजिटल शाळांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी देखील मागणी करण्यात आली आहे.
कोरोना काळात राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी मिळून कार्य केले मात्र केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेला निधी खर्च करण्यासंदर्भात काही तांत्रिक अडथळे असल्याने त्याचे योग्य रीतीने ऑडिट करण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र अद्यापही यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे लक्षात आणून दिल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत समिती नेमलेली असून लवकरच अहवाल प्राप्त होईल असे सांगितले आहे.
जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ज्या आरोग्य केंद्रांचे ७० ते ८०% काम पूर्ण झाले आहे. त्यांना त्वरित निधी उपलब्ध करून देऊन ही आरोग्य केंद्रे नागरिकांच्या सेवेसाठी खुली व्हावीत अशी भूमिकाही मांडली.
याप्रसंगी पालकमंत्री श्री.अमितजी देशमुख, राज्यमंत्री श्री.संजयजी बनसोडे, खासदार श्री.सुधाकरजी शृंगारे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, आमदार श्री.विक्रमजी काळे, आमदार श्री.बाबासाहेबजी पाटील, आमदार श्री.धीरजी देशमुख, आमदार श्री.अभिमन्यूजी पवार, जिल्हाधिकारी श्री.पृथ्वीराजजी बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अभिनवजी गोयल, पोलीस अधीक्षक श्री.निखीलजी पिंगळे यांची उपस्थिती होती.