जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नागरिकांचे आरोग्य, रेशनिंग व्यवस्था आणि राठोडा येथील साधकांची परिस्थिती

जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन नागरिकांचे आरोग्य, रेशनिंग व्यवस्था आणि राठोडा येथील साधकांची परिस्थिती; यासंदर्भात आढावा व उपाययोजना याबाबत चर्चा करून आवश्यक दिशादर्शक सूचना करण्यात आली.

जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांच्यासोबत घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये प्राधान्याने आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने काम करत आहे याची माहिती घेऊन, ती अधिक गतिमान करण्याची सूचना केली.

रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज असून प्रत्येक गरजूला अन्नधान्य मिळावे याची खबरदारी घ्यावी याबाबत सविस्तर चर्चा झाली, जिल्ह्यातील शेवटच्या नागरिकांपर्यंत अन्न धान्य पोहोचावे यासाठी यंत्रणा आग्रही ठेवण्याची सूचना देण्यात आले.

लॉकडाऊन मुळे दिव्यांग व्यक्तींची मोठी गैरसोय होत आहे. अशा व्यक्तींना शासनाच्या वतीने मिळणारे सर्व लाभ आणि सुविधा घरपोच देण्यात यावे, यासंदर्भात नियोजन आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच बँकांमध्ये होत असलेल्या गर्दी विषयी लक्ष वेधले. त्यामुळे जिल्हा बँकेसह इतर सर्व बँकांना काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे निर्देश द्यावेत अशी सुचनाही करण्यात आली.

निलंगा तालुक्यातील राठोडा येथे वास्तव्यास असणाऱ्या महानुभाव पंथाच्या साधकांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. लॉक डाऊनमुळे हे साधक तेथे अडकले असून प्रशासनाने त्यांच्यासाठी नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती केलेली आहे. पावसाने झालेल्या नुकसानीची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी सुचनावजा मागणी प्रशासनाकडे केली. या साधकांना त्यांच्या मूळ आश्रमात पोचवण्याची मागणी आपण प्रशासनाच्या माध्यमातून राज्यशासनाकडे केली आहे. या सर्व साधकांची नियमित आरोग्य तपासणी केली जात असून ते सुरक्षित आहेत याविषयी सर्व नागरिकांनी आश्र्वस्त राहावे.