Marathwada rail coach factory

महाराष्ट्राचे हृदय म्हणजे मराठवाडा-1

सामाजिक व राजकीय क्रांतीची भूमी म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असा समृद्ध इतिहास या मराठवाड्याला लाभलेला आहे. मराठवाड्याचा इतिहास आणि संस्कार जितके समृद्ध तितकेच इथला विकास मात्र कायम दुर्लक्षित.

देशाच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या गेल्या ७० वर्षांच्या इतिहासामध्ये मराठवाड्याने कायम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले योगदान दिले. परंतु त्यातुलनेत मराठवाडा मात्र कायम उपेक्षित राहिला. निसर्गाची अवकृपा व औद्योगीकरणाच्या अभावामुळे विकासाच्या घोडदौडीमध्ये मराठवाडा कायम मागे राहिला. तब्बल ९ जिल्हे असलेल्या या विभागाला ना चांगल्या पायाभूत सुविधा मिळाल्या ना विकास व रोजगाराच्या समतोल संधी मिळाल्या. परिणामी कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी आपली जन्मभूमी सोडून नव्या ठिकाणी जाण्याची वेळ अनेकांवर आली. महाराष्ट्राभर पसरलेल्या या सर्व नागरिकांनी त्या त्या ठिकाणाच्या प्रगतीमध्ये आपली मोठी भूमिका बजावली. परंतु आपला मराठवाडा मात्र कायम दुष्काळात होरपळताना आणि विकासासाठी आतुर झालेला पाहत राहणे हेच त्यांच्या नशिबी आले होते.

अखेर मराठवाड्याची प्रतीक्षा संपली आणि विकासाचे आल्हाददायक वारे मराठवाड्यातील प्रत्येक मनाला स्पर्शून वाहू लागले. प्रगतीची नवी कवाडे उघडत ही वैभवलक्ष्मी मराठवाड्याच्या अंगणामध्ये प्रवेश करती झाली. ही विकासलक्ष्मी म्हणजे ‘मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना’. महाराष्ट्र राज्यातील एकमेव व संपूर्ण देशातील चौथा रेल्वे बोगी कारखाना मराठवाड्यातील लातूर येथे उभारण्यात आला असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेल्वे बोगी याठिकाणी निर्माण होत आहेत. लक्षावधी लोकांच्या अपेक्षा, असंख्य लोकांचे प्रयत्न व विकासपुरुषांच्या द्रष्टेपणामुळे हा प्रकल्प साकारला असून मराठवाड्याच्या ‘सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय’ यामुळे सुरु झाला आहे.

Loading...
Loading...