शब्द तुमच्या शंभोचा

प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो
नमस्कार!

आज या अहवालाच्या निमित्ताने आपणांशी संवाद साधतो आहे, याचा मला आनंद आहे. आपल्या सर्वांचा विश्वास सार्थ ठरवीत मागील पाच वर्षे महाराष्ट्राच्या विधिमंडळ व मंत्रिमंडळात कार्यमग्न होतो. लातूर शहर, जिल्हा व राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कायम वचनबद्ध राहत एकदिलाने काम केले. याचे फलित अनेक विकासकामांच्या रूपाने आपणासमोर आहेच. या कामांचाच परिणाम म्हणून देशातला पहिला मेट्रो कोच व चौथा रेल्वे कोच कारखान्याचे काम असेल, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील दुष्काळ कायमचा संपविणारा वॉटर ग्रीड प्रकल्प असेल किंवा लातूरमध्ये सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल मंजूर करण्याचे काम असेल; या ठळक कामांसह अशा अनेक कामांचा उल्लेख करता येईल.

निलंगा, लातूर शहर आणि जिल्ह्याने मला नेहमीच भरभरून दिले आहे. माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे व जिल्ह्यात झालेल्या चौफेर विकासकामांमुळे विरोधकांकडे आज बोलण्यासाठी विषयच राहिला नाही. बंधू-भगिनींनो, तु्‌म्ही माझ्यासह भारतीय जनता पक्षावर दाखविलेल्या विश्वासामुळे लातूर जिल्हा परिषद, लातूर महानगरपालिका, सातही पंचायत समिती आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकतो आहे. आज जिल्हा शत-प्रतिशत भाजपमय बनलेला आहे आणि याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यात विकासकामांनी गती घेतली आहे.

मला समाजकारणात येऊन सतरा वर्षे झाली. मी केवळ विकासाचं राजकारण केलंय. निलंगा असेल, लातूर शहर असेल वा लातूर जिल्हा असेल, सर्वांनी मला सुरुवातीपासून पोटच्या लेकरासारखं सांभाळलंय. मी वचन देतो की, आता हा संभाजी या जिल्ह्यातील या जनतेच्या डोळ्यांमध्ये कधी अश्रू येऊ देणार नाही. तुम्ही मला आजपर्यंत सांभाळलंय. इथून पुढं तुमची काळजी घेणं ही माझी जबाबदारी! तुमच्या सुखदु:खांत मी तुमच्यासोबत असेन. मी निलकंठेेश्वराच्या साक्षीनं वचन देतो, जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे, तोपर्यंत तुमची सेवा करीत राहीन.

मित्रांनो, पाणी हे विकासाचं एक उत्तम साधन आहे. परंतु आपल्या भागाने कायमस्वरूपी दुष्काळाचा सामना केला आहे. मात्र मी हे आपणांस ठामपणे सांगू इच्छितो की, जलयुक्त शिवार, इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान, मराठवाडा वॉटर ग्रीड योजनांमुळे येत्या काळात हे चित्र पूर्ण बदलेल.

अनेक दिवसांपासून लातूरच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नव्हता, ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली हे आपणा सर्वांना माहीत आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने लातूरला उजनी धरणाचं पाणी आणण्यासाठीची योजना मूर्त रूप घेत आहे. माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील यासाठी सकारात्मक भूमिका मांडली आहे. उजनी धरणाचं पाणी लातूर शहरात आणण्यासाठी सध्या राज्य सरकारने योजना आखलेली असून पुढील २ वर्षांत लातूरला उजनी धरणाचं पाणी मिळवून देऊ शकलो नाही, तर भविष्यात ज्या पदावर असेन त्या पदाचा राजीनामा देईन आणि लातूरच्या पाण्यासाठी संघर्ष करेन. शिक्षण, रोजगार, आरोग्य व पाण्यासह सर्वच पातळ्यांवर लातूरच्या विकासाला नवी दिशा देणार आहे. यासाठी मला आपली खंबीर साथ व भरभरून आशीर्वाद हवे आहेत. मला खात्री आहे की, तुम्ही माझ्या सोबत आहातच…!

मा. संभाजीराव पाटील निलंगेकर
पालकमंत्री, लातूर