Rail Coach Factory

मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी भाग – ३

३१ जून २०१८ रोजी : मराठवाडा कोच फॅक्टरीला केंद्र सरकारची परवानगी

मराठवाड्याचा झालेला अपुरा विकास आणि वारंवार ओढवणारी दुष्काळाची परिस्थिती यामुळे गेल्या तीन ते चार दशकांमध्ये याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात स्थलांतर मुंबई-पुण्यासह इतरत्र ठिकाणी झाले आहे. विशेषत: मराठवाड्यातील सुशिक्षित तरुणवर्ग रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे प्रणेते स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मराठवाड्याच्या अनुशेषावर वारंवार भाष्य केले. तो भरून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे शिक्षणाचा अनुशेष दूर करणे. लातूरसह ग्रामीण भागातील मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून स्व. दादासाहेबांनी महाराष्ट्र शिक्षण समितीच्या माध्यमातून ग्रामीण मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण अगदी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून दिले. दादांच्या या प्रयत्नांनी लातूरात मोठी शैक्षणिक क्रांती घडली खरी, परंतु सुशिक्षित हातांना रोजगार उपलब्ध न झाल्यामुळे हे सगळे तरुण पुणे-मुंबईकडे वळाले. मराठवाड्याच्या भविष्याला खऱ्या अर्थाने आकार देऊ शकणारे हे तरुण हात व कुशाग्र बुध्दिमत्ता नाईलाजाने दुसरीकडे जाऊन खपू लागली.

मराठवाड्यातील तरुणांचे होणारे हे स्थलांतर रोखणे तसेच बाहेर गेलेल्या नागरिकांना आपल्या मूळगावी येण्यासाठी प्रेरित करून त्यांना चांगली दळणवळणाची सोय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु होते. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. रस्तेविकास आणि लातूरसाठी स्पेशल रेल्वे गाड्या सुरु करण्यासाठी त्यांच्या मदतीने अगदी केंद्रीय स्तरावर प्रयत्न केले गेले. केंद्रीय रस्तेविकास मंत्री आदरणीय श्री. नितीनजी गडकरी साहेब यांनी मराठवाडा आणि विशेषतः लातूरसाठी हजारो कोटी रुपयांचे रस्तेविकास प्रकल्प मंजूर केले.

दुसरीकडे मराठवाड्यात रेल्वेचा विस्तार व्हावा, म्हणून सातत्याने प्रयत्न सुरु होते. मराठवाड्याच्या विकासामध्ये रेल्वे वाहतुकीचे फार मोठे महत्त्व आहे. त्यामुळे मराठवाडा रेल्वेचे बळकटीकरण आणि विस्तारासाठी अनेकदा मागण्या होत आल्या आहेत. याच मागण्या घेऊन तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. सुरेशजी प्रभू साहेब यांची भेट घेतली. प्रभू साहेबांनी लातूरकरांच्या भावना ओळखून लातूरसाठी तीन नव्या रेल्वे गाड्या सुरु केल्या. काही गाड्यांना लातूरला हॉल्ट देण्यात आला, विविध ठिकाणी रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण करणे तसेच इतर सुविधा उभारण्यासाठी त्यांनी मदत केली.

दरम्यान २०१६ मध्ये लातूरमध्ये निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दुष्काळ निवारणाकरिता एखाद्या ठिकाणी रेल्वेने पाणी पोहोचविण्याची घटना लातुरात घडली. यावेळी देखील रेल्वे हीच लातूरकरांच्या मदतीला धावली. त्यावेळी लातूरच्या सर्वांगीण विकासाचा आणि समृद्धीचा निर्धार प्रत्येक नागरिकाने केला. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर असणारी जबाबदारी यामुळे आणखी वाढली. यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये माझाही समावेश करून घेण्यात आला व माझ्याकडे लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.

दरम्यान याचवेळी रेल्वेविकासाठी देशात एक नवीन कोच फॅक्टरी उभारण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचे समजले. हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक व जवळपास ४५ हजार रोजगारनिर्मितीची क्षमता असलेला हा प्रकल्प मराठवाड्याला मिळाला पाहिजे, असा निर्धार करून यासाठी आम्ही काम सुरु केले. आदरणीय देवेंद्रभाऊंच्या कानावर हा विषय घातला. त्यांनी देखील याला सकारात्मक पाठींबा देत, हा प्रकल्प मराठवाड्याला मिळवून देण्याचा शब्द दिला. त्या दृष्टीने प्रस्ताव तयार केले गेले. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा सुरु झाली. रेल्वे मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा केला गेला. आदरणीय देवेंद्रजींनी स्वतः यागोष्टीकडे लक्ष दिले. मी देखील दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन या प्रकल्पाच्या दृष्टीने असलेली मराठवाड्याची क्षमता, भौगोलिक स्थिती, मनुष्यबळाची उपलब्धता तसेच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली या प्रकल्पाची गरज केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली. मराठवाड्याची पूर्वपुण्याई आणि तत्कालीन फडणवीस सरकारच्या प्रयत्नांनी अखेर ३१ जून २०१८ रोजी तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री मा.श्री. पियुषजी गोयल साहेबांनी मराठवाडा येथे कोच फॅक्टरी उभारण्याच्या प्रस्तावाला अधिकृत मान्यता दिली. मराठवाड्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतका मोठा प्रकल्प या भागाला मिळाला. अनेक कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवणारा आणि मराठवाड्याचा शाश्वत विकास घडवू शकणाऱ्या या प्रकल्पामुळे घरोघरी आनंद साजरा केला गेला.