मॅग्नेटिक महाराष्ट्र : मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्र राज्याला एकाच वेळी अभूतपूर्व अशी विक्रमी गुंतवणूक मिळवून देणारा कार्यक्रम म्हणजे ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांच्या पुढाकारातून साकारलेल्या या कार्यक्रमातून अवघ्या दोनच दिवसांमध्ये तब्बल १२ लाख कोटी रुपयांची थेट गुंतवणूक राज्याला मिळाली होती. मा. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या याच कार्यक्रमात २० फेब्रुवारी २०१८ रोजी मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीसंबंधी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

यासाठी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुषजी गोयल हे स्वतः याठिकाणी उपस्थित होते. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यामध्ये ३५० एकर जागेवर रेल्वे मंत्रालय ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच भविष्यात टप्प्याटप्यांमध्ये तब्बल २००० एकरवर हा प्रकल्प विस्तार करण्याची घोषणा त्यांनी केली. याचबरोबर राज्य सरकारने या प्रकल्पासाठी घेतलेल्या परिश्रमाचे त्यांनी कौतुक केले. मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अवघ्या २ दिवसामध्ये या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून दिली तर १० दिवसांमध्ये यासाठी आवश्यक असलेल्या सरकारी परवानग्या व इतर बाबींची पूर्तता केली. यातून तत्कालीन राज्य सरकार हे मराठवाड्याच्या विकासासाठी किती कटिबद्ध आहे, हे जनतेला दाखवून दिले.

आदरणीय मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकल्पाचे मराठवाड्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व पुन्हा एकदा उद्गृत केले. या प्रकल्पातून १५ हजार नागरिकांना प्रत्यक्ष तर ४५ हजार नागरिकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पामुळे लातूरसह आजुबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये रोजगारपूरक वातावरण तयार होऊन नवे व्यवसाय उभे राहतील, ज्यातून अनेक नागरिकांना रोजगार मिळून बेरोजगारीचा प्रश्न मोठ्याप्रमाणावर सुटेल. यातूनच समृद्ध लातूर आणि समृद्ध मराठवाड्याचे स्वप्न पूर्ण होण्यास बळ मिळेल.