१६ एप्रिल १८५३, भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दिवस. याच दिवशी भारतामध्ये पहिली प्रवाशी रेल्वे धावली. अभिमानाची बाब म्हणजे पहिली रेल्वे महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई-ठाणे या मार्गावर धावली. महाराष्ट्र राज्याने रेल्वेच्या प्रवासी सेवेला सुरुवात केली आणि रेल्वेचे हे जाळे संपूर्ण भारतभर पसरले. आज भारतामध्ये ६५ हजार किमीपेक्षा अधिकचे रेल्वे मार्ग तयार झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये यातील एकूण ५ हजार ७२६ किमी लांबीचे मार्ग गेल्या १६७ वर्षांमध्ये तयार झाले आहेत. परंतु दुर्दैवाने रेल्वे विकासाच्या बाबतीत ही मराठवाड्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही.
निजामच्या काळामध्ये हैदराबाद संस्थामध्ये पहिल्यांदा रेल्वे आली. परंतु ब्रिटीशांच्या फसव्या धोरणामुळे निजामने हैदराबाद संस्थामध्ये रेल्वेचे जाळे विकसित होऊ दिले नाही. त्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर केवळ लातूर ते लातूर रोड या दरम्यान रेल्वे लाईन टाकण्यात आली. पुढे छत्रपती संभाजीनगरसह काही भागांमध्ये सिंगल रेल्वे लाईन उभारण्यात आल्या व १९९० पर्यंत यात कसलीही सुधारणा झाली नाही. १९९० च्या दशकामध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे रुंदीकरणासाठी मोठे आंदोलन झाले, त्यामुळेच १९९२मध्ये मुंबई-मनमाड-नांदेड रेल्वे धावली. व मराठवाड्यामध्ये नांदेडपर्यंत रेल्वेचा विस्तार झाला. याच मार्गावर जालना व पूर्णा ही दोन मोठी स्थानके पुढे निर्माण झाली.
मराठवाड्यामध्ये सध्या छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, पूर्णा, लातूर व नांदेड ही मोजकीच प्रमुख रेल्वे स्थानके आहेत. ज्यातील एकूण मार्गांची लांबी ही ८०० किमी पेक्षाही कमी असून मराठवाड्यातील मोठा भाग आजही या रेल्वेसेवेपासून वंचित आहे. येथील स्थानिक शेतमालाची वाहतूक तसेच प्रवासी वाहतुकीसाठी हे रेल्वे जाळे मोठ्या प्रमाणात विकसित करण्याची मागणी वारंवार केली गेली. परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या कमतरतेमुळे ते कधीही शक्य झाले नाही. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे जागतिक कीर्तीचे शहर मराठवाड्यात असतानाही या रेल्वे स्थानकाचाही विकास होऊ शकला नाही. अनेक ठिकाणी सिंगल रेल्वे लाईन असून तिचे दुहेरीकरण अजूनही झालेले नाही. अशात इतर जिल्हे व लातूरकडे दुर्लक्ष होणे हे क्रमप्राप्तच होते.
लातूर जिल्ह्यामध्ये सध्या लातूर हे एकमेव रेल्वे स्टेशन असून ते १४ छोट्या स्थानकांशी जोडले गेले आहे. कुर्डवाडी रेल्वे जंक्शनपासून बार्शीहून येणाऱ्या सिंगल रेल्वे लाईनने हा संपूर्ण जिल्हा पूर्व-पश्चिम व दक्षिणोत्तर जोडला गेला आहे. लातूरला इतर जिल्हे व मुख्य शहरांशी जोडण्यासाठी तसेच रेल्वे वाहतुकीला गती देण्यासाठी दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याकरिता लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सातत्याने राज्य सरकार व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. यातून लातूरसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या. लातूर रेल्वे स्थानकाचा विकास, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण व दुपदरीकरण व मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी सारखे अनेक विकासकामे गती घेऊ लागली.



