मराठवाड्याच्या शाश्वत विकासाची गुढी

२० फेब्रुवारी २०१८ रोजी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीसंबंधी राज्य व केंद्र सरकार यांच्यात सामंजस्य करार (MoU) पार पडल्यानंतर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला सुरुवात झाली.

३१ मार्च २०१८ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासन, प्रशासन आणि स्थानिक पातळीवर कामास सुरुवात झाली. संपूर्ण मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा प्रकल्प या भागाला मिळाला होता. मराठवाड्याचे संपूर्ण रुपडे पालटवणारा हा प्रकल्प या भागातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बदल घडविणार आहे. परंतु दुर्दैवाने लातूरसह मराठवाड्यामध्ये याविषयी पुरेशी जागृती झालेली नव्हती. लातूरसह संपूर्ण मराठवाड्याचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरणारा हा प्रकल्प भविष्यात या भागातील प्रत्येक उंबरठ्याचा विकास साधणार आहे, ही बाब सर्वांच्या लक्षात आणून देण्यासाठी तसेच ‘हा जनसामान्यांचा प्रकल्प आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात जागृत करण्यासाठी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून ‘विकासाची गुढी’ या संकल्पनेवर आधारित बैठकांचे जिल्हाभर आयोजन करण्यात आले.

यामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष सहभागी करून या प्रकल्पाविषयी त्यांना माहिती देणे, यातून भविष्यात आपल्या भागाचा आणि आपल्या युवापिढीचा होणारा विकास याविषयी चर्चा करण्यात आल्या. नागरिकांना गुढीची भेट देऊन या प्रकल्पामुळे ‘विकासाची गुढी’ ही प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत येणार आहे, हा विश्वास त्यांच्यात जागा केला. यामुळे नागरिक तर जागृत झालेच परंतु हा प्रकल्प आम्हा सर्व लातूरकरांचा आणि येथील कष्टकरी समाजाचा आहे, हा आपलेपणा प्रत्येकाच्या मनात जागा झाला.