प्रोजेक्ट आनंदी
प्रोजेक्ट आनंदी तिचा गौरव आपली जबाबदारी!
‘मासिक पाळी’ हा प्रत्येकाच्या जवळचा परंतु चर्चेतून कायम चार हात लांब ठेवला गेलेला विषय. समाजातील प्रत्येक स्त्रीसाठी हा विषय जवळचा, तितकाच प्रत्येक पुरुषासाठी देखील हा जवळचा विषय आहे. परंतु यावर कधीही जाहीर वाच्यता केली जात नाही. आजच्या २१ व्या शतकात समाज मोठ्या प्रमाणात प्रगत झाला आहे. तरी देखील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘मासिक पाळी’ याविषयावर खुल्यापणाने बोलणे टाळले जाते.
प्रोजेक्ट आनंदी – एक उपक्रम तिच्यासाठी
मासिक पाळीविषयीचे गैरसमज दूर करण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे याविषयी खुलेपणाने चर्चा करणे. वय वर्ष १२ ते ४५ या सर्व वयोगटातील महिलांना मासिक पाळीला सामोरे जावे लागते. परंतु ‘लाजेच्या पडद्या आड’ हा विषय झाकलेला असल्यामुळे याविषयी घरात देखील बोलले जात नाही. ‘बायांचा विषय’ असे म्हणून घरातील पुरुष आणि स्वतः महिला देखील याविषयी बोलणे टाळतात. परंतु आता वेळ आली आहे, याविषयी खुलेपणाने बोलण्याची, स्त्रियांबरोबर पुरुषांनी देखील पुढाकार घेण्याची. किशोरवयीन मुली तसेच प्रौढ स्त्रियांना मासिक पाळीविषयी माहिती देणे, तसेच पाळी दरम्यान आवश्यक असलेले साहित्य पुरविण्याच्या उद्देशाने अक्का फाउंडेशन मार्फत ‘प्रोजेक्ट आनंदी’ राबवण्यात येत आहे.
ज्याचा मुख्य उद्देश :
– मासिक पाळी सारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल समाजात असणारे गैरसमज, अंधश्रद्धा तसेच अशुद्धपणाची भावना दूर करणे.
– किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जागृती निर्माण करणे.
– मासिक पाळी दरम्यान निगा कशी राखावी ? याविषयी माहित देणे.
– पाळीदरम्यान आवश्यक असलेले साहित्य (उदा. सॅनेटरी पॅड) उपलब्ध करून देणे.
– ग्रामीण भागामध्ये महिला बचत गटांमार्फत सॅनेटरी पॅडचे उत्पादन सुरु करून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न.
– मासिक पाळीविषयी जागृती अभियानत पुरुषांचा सहभाग वाढवणे.
– येत्या तीन वर्षात संपूर्ण लातूरला ‘मासिक पाळी व आरोग्यविषयी जागरूक जिल्हा’ अशी ओळख मिळवून देणे.
– शिक्षणाप्रमाणे मासिक पाळी जागृतीचा लातूर पॅटर्न तयार करून तो देशभर पोहोचविणे.
हे असणार आहेत.
टप्पा १ – सर्वेक्षण आणि जागरूकता (Surveys & Awareness)
या टप्प्यामध्ये अक्का फाउंडेशन मार्फत किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी विविधांगी कार्यक्रम तसेच चर्चासत्रांच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जागृती करण्यात येईल. विविध शाळांचे सर्वेक्षण करून मासिक पाळी याविषयी अभ्यासवर्ग घेतले जातील.


टप्पा २ – वितरण आणि नियोजन (Distribution & Logistics)
पहिल्या टप्प्यामधील सर्वेक्षणादरम्यान निवडण्यात आलेल्या शाळांमधील मुलींना मोफत सॅनेटरी पॅडचे वितरण केले जाईल. दर महिना मासिक पाळी दरम्यान ज्या मुलींना सॅनेटरी पॅडची आवश्यकता असेल त्या मुलींना प्रोजेक्ट आनंदीच्या माध्यमातून अक्का फाउंडेशनद्वारे शाळेमध्येच सॅनेटरी पॅड उपलब्ध करून दिले जातील.
टप्पा ३ – स्वयंपूर्णता (Self-Sustainability)
गाव पातळीवर विविध मंडल (cluster) तयार करून महिला बचत गटांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर सॅनेटरी पॅडचे उत्पादन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना रोजगार संधी उपलब्धी करून देण्याचा एक अभिनव प्रयत्न याद्वारे केला जाईल.